सनद पट्टे मिळाल्याने सिंगणपेठवासियांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य

भाग्यश्री आत्राम यांच्या प्रयत्नांना यश

अहेरी : तालुक्यातील सिंगणपेठ येथील शेतकऱ्यांना माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सनद पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर सनद पट्टे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.

मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ठ सिंगणपेठ येथील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून सनद/पट्टा मिळावा म्हणून प्रयत्नात होते. त्यामुळे शेतकरी मागील अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना मालकी हक्क, स्वतंत्र मालमत्ता पत्रक नसल्याने त्यांना कुठलाही लाभ मिळत नव्हता. सदर मालमत्तेवर बँक कर्ज मिळणेही शक्य नव्हते. सिंगणपेठवासीयांची अडचण लक्षात घेऊन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेऊन सदर काम हाती घेतले आणि आपल्या कार्यकर्त्यांना या कामात लावून अखेर सिंगणपेठवासीयांना सनद/पट्टे मिळवून दिले.

८ डिसेंबर रोजी भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते तब्बल ३८ शेतकऱ्यांना सदर सनद/पट्टे वाटप करण्यात आले. अशक्य झालेले काम ताईंनी शक्य करून दाखविल्याने गावकऱ्यांनी गावात त्यांचे जल्लोषात स्वागत करून आभार मानले. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक गुणवंत रणदिवे, शिस्तेदार पंकज आंभोरे, दृष्टांग भुतांगे, अविनाश मडावी, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, महेश बाकीवार, साईनाथ अलवलवार, नागेश करमे, शिवराम आत्राम, सतीश निखाडे, गणपती डोके, श्रीकांत पाल तसेच लाभार्थी उपस्थित होते.