आलापल्ली : आलापल्ली ते एटापल्ली हा मार्ग सुरजागड लोहखाणीतील खनिजाच्या वाहतुकीमुळे सतत वर्दळीचा राहतो. पण या मार्गावर अलिकडे ठाण मांडून बसणाऱ्या गाई, म्हशी अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. गुरूवारी येलचिलपासून दोन किलोमीटरवर एका गाईला धडक बसून एक दुचाकीस्वार युवक चांगलाच जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आलापल्लीला नेण्यात आले.
हा मार्ग पूर्वी खड्डेमय होता. लॅायड्स मेटल्सने रस्त्याचे बांधकाम केल्यानंतर आता दुचाकीसह सर्वच वाहने सुसाट जातात. पण मध्येच आडवे येणारी जनावरे, किंवा रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या म्हशी किंवा गाईंमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. यातूनच अनेक वेळा दोन दुचाकींची टक्करही झाली आहे. जनावरांमुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. पण प्रशासनाने त्यावर ठोस उपाययोजना अद्याप तरी केलेल्या नाहीत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी स्थायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.