अहेरीत नवरात्रीनिमित्त गरबा-दांडियासह महिलांच्या बतकम्मा नृत्याची धमाल !

जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

अहेरी : नवरात्रोत्सवाच्या शुभपर्वावर येथील स्नेहा लॉनवर बुधवारी गरबा-दांडिया व बतकम्मा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तर अध्यक्षस्थानी भावना खोब्रागडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अर्चना बाळापुरकर, स्नेहल साटोरे, स्वाती जैनवार, पुष्पा अलोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन भाग्यश्री आत्राम यांच्या पुढाकाराने केले होते. यावेळी तब्बल १५ चमुंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. दांडिया-गरबा नृत्यासाठी प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये रोख, द्वितीय 15 हजार रुपये रोख, तर तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये रोख, तसोच बतकम्मा नृत्यासाठी सुद्धा याच स्वरुपात विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर व सन्मानपत्रही वितरित करण्यात आले.

आपल्या भागातील युवती व महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच महिलांच्या सांस्कृतिक व कलेचा विकास व्हावा यासाठीच नवरात्रोत्सवाच्या पर्वावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे याप्रसंगी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.

स्पर्धेचे परीक्षण प्रा.मंगला मेश्राम, माधुरी मुडपल्लीवार, विना लोनबले, दीपा कोकावार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोने यांनी, तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, निवेदिता वीरगोनवार, पूर्वा दोन्तुलवार, पल्लवी दहागावकर, आरती डुकरे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व प्रेक्षकगण उपस्थित होते.