भामरागड : कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारे पोलिस इतर जिल्ह्यात केवळ घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, बंदोबस्त सांभाळणे किंवा आलेल्या तक्रारीची चौकशी करणे एवढेच कर्तव्य समजून काम करत असतात. पण गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस मात्र त्यापलिकडे जाऊन मानवता जपताना दिसतात. येथे पागल म्हणून फिरत असलेल्या एका गतीमंद व्यक्तीचे पोलिसांच्या क्युआरटी टिममधील सदस्यांनी रूप बदलवत त्याचे आरोग्य जपण्यासाठी मदत केली.
सदर इसम अर्धनग्न अवस्थेत गावात फिरत होता. क्युआरटी टिमने त्याचा पूर्वइतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याबद्दल तो फारसे काही बोलत नव्हता. जवानांनी त्याला आपल्या सोबत चलण्यास सांगितले, मात्र तो येण्यास तयार नव्हता. त्यामुळे जवानांनी जबरदस्तीने त्याला आपल्यासोबत नेले. एका पागलाला पोलिस पकडून का नेत आहे, असा प्रश्न पडलेले लोक घराबाहेर येऊन हे दृष्य पाहात होते. पोलिस नेत आहे म्हणजे त्याने काहीतरी केलेच असणार असेही अनेकांना वाटत होते. पण त्याबद्दल विचारण्याची हिंमत कोणात नव्हती. त्यामुळे काही लोकांनी पत्रकारांना फोन करून ही माहिती दिली. उत्सुकता म्हणून पत्रकारही पोलिसांचा माग काढत तिथे पोहोचले. पण खरा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनाही पोलिसांमधील माणुसकी कळली.
क्यूआरटीच्या जवानांनी त्या गतीमंद व्यक्तीला पर्लकोट नदीच्या किनाऱ्यावर नेऊन त्याची कटिंग केली. त्यानंतर त्याची आंघोळ घालून देऊन नवीन कपडेही त्याच्या अंगावर चढवले. त्यामुळे रस्त्यावर फिरणारा तो पागल हाच का, असा प्रश्न पडण्यासारखे त्याचे रूप पालटले. या घटनेकडे आधी शंकेने पाहणारे लोक पोलिसांमधील मानवता पाहून कौतुक करू लागले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल हे नेहमीच आपल्या पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी लोकांच्या सर्व प्रकारच्या मदतीला धावून जाण्याची सूचना देत असतात. त्यांच्या सूचनेचे पालन करीत भामरागडच्या क्युआरटी टिमच्या जवानांनी एका गतीमंद व्यक्तीबद्दल दाखविलेली ही सहृदयता कौतुकास्पद आहे.