पोलिसांच्या पुढाकाराने मुलचेरात केले 51 व्या वाचनालयाचे लोकार्पण

नवीन प्रशासकीय इमारतीचेही उद्घाटन

मुलचेरा : वाचन संस्कृतीला चालना देऊन युवा वर्गाच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना प्रगतीचे नवीनवीन मार्ग कळावेत यासाठी पोलिस विभागाच्या पुढाकारातून वाचनालये उघडली जात आहेत. याच श्रृंखलेत 51 व्या वाचनालयाचे लोकार्पण शनिवारी (दि.2) मुलचेरा येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. यासोहळ्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन ग्रंथदिंडीही काढली.

सुरूवातीला पोलिस संकुल अहेरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस उपरुग्णालयाचे तसेच पोलिस स्टेशन मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याचवेळी मुलचेरा येथे “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने मुलचेरा पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन आणि जनजागरण मेळावा पार पडला.

यावेळी अहेरी उपविभागांतर्गत मुलचेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 600 ते 700 नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ अधिका­ऱ्यांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांना कार्यक्रमस्थळी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यात 10 शालेय विद्यार्थींनींना सायकली, 5 महिलांना धुररहीत शेगडी व उपस्थित नागरिकांना 300 हून अधिक शासकिय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

पोलिस दादालोरा खिडकीचा आणि नवीन वाचनालयाचा येथील नागरीकांनी व विद्यार्थांनी लाभ घ्यावा, तसेच वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन आपल्या आई वडीलांचे तसेच गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन यावेळी पो.अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. यांनी त्यांनी 250 पुस्तके वाचनालयाला भेट दिली.