विविध मागण्यांसाठी ढिवर समाजाचा ४ ऑक्टोबरला धडक महामोर्चा

हक्क, अधिकारांसाठी आवाज उठविणार

गडचिरोली : ढिवर, भोई, केवट व तत्सम जमातीची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असताना सुध्दा शासनाच्या विविध योजना, पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नोकरी, आरक्षणापासून त्यांना वंचित ठेवल्याचा ठपका ठेवत समाज संघटनेच्या वतीने आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी येत्या 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे.

गडचिरोली जिल्हा भोई/ढिवर, केवट व तत्सम जमाती संघटनेद्वारा आयोजित या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, किशोर बावणे, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, संयोजक कृष्णाजी मंचालवार, सल्लागार रामदास जराते, परशुराम सातार, उकंडराव राऊत, मोहन मदने, सुधाकर गद्दे, महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गेडाम, जिल्हा सदस्य जयश्री जराते हे करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता हा मोर्चा शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोली येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे.

ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत प्राधान्यक्रमाने मंजूर केलेल्या प्रतिक्षा यादीनुसार अत्यंत गरजू भोई / ढिवर / केवट व तत्सम जातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, प्रधानमंत्री आवास योजना / यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकूल योजना व मोदी आवास घरकुल योजनेचा कोटा स्वतंत्ररित्या राखीव करण्यात यावा, एन.टी.बी. प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे देऊन अन्याय दूर करावा. शहरी भागात ज्याप्रमाणे घरकुलाकरीता 2.50 लक्ष रुपये निधी देण्यात येतो त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांनाही तेवढाच निधी देण्यात यावा. भोई/ढिवर, केवट व तत्सम जमातीची स्वतंत्र जनगणना करुन हक्काचे आरक्षण देण्यात यावे यासह इतर अनेक मागण्या या मोर्चातून मांडल्या जाणार आहेत.