गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकाच दिवसात आपसी तडजोडीतून 257 प्रलंबित व 206 दाखलपूर्व खटले निकाली काढण्यात आले.
सदर लोकअदालतीमध्ये तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रकरणे, तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी यासंबंधीचे वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधित प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीची प्रकरणे, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच मधील मिळून 257 प्रलंबित आणि 206 दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.
या लोक अदालतीच्या माध्यमातून 4 कोटी 15 लक्ष 16 हजार 175 रुपये वसुल करण्यात आले. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पेशल ड्राईव्हद्वारे एकूण 114 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांनी उभयतांचा साडी-चोळी व शेला देवून सत्कार केला. न्या.शुक्ल यांच्यासह प्राधिकरणचे सचिव आर.आर.पाटील यांच्या देखरेखीखाली या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधिश-1 तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश यु.एम. मुधोळकर, दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी एस.पी.सदाफळे, सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) सी.पी.रघुवंशी यांनी वेगवेगळ्या पॅनलची जबाबदारी सांभाळली. सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर, तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकीलवृंद, तसेच न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक पी.व्ही.संतोषवार, वरिष्ठ लिपिक एन.आर. भलमे, तसेच कनिष्ठ लिपिक एन.डी.गुरनूले, एस.के.चुधरी, जे.एम.भोयर, एच.एम.गायमुखे, एस.एन.आळे व शिपाई एस.डब्ल्यु.वासेकर यांनी परिश्रम घेतले.