गडचिरोली : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडचिरोली शहरातील संघर्ष नगरातील 20 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वस्तू आणि जीवनोपयोगी साहित्याची हाणी झाली आहे. लांझेडा लगतच्या या संघर्षनगरात पाणी जमा झाल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे सांगत नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री जराते यांनी सोमवारी या नगराला भेट देऊन पाहणी केल्यानंतर तेथील विदारक स्थिती उघडकीस आली. मागील 20 वर्षांपासून संघर्ष नगरात नगर परिषद प्रशासनाने रस्ते, पिण्याचे पाणी अशा कोणत्याही पायाभूत सुविधा न पुरविल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासन नियमाप्रमाणे आर्थिक मदत द्यावी. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषदेकडून पिण्याचे स्वच्छ पाणी, नाल्यांची स्वच्छता यासह इतर सुविधा पुरविण्याची मागणी जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.