अखेर सती नदीवरील अर्धवट पुलामुळे कुरखेड-कोरची मार्ग 29 जूनपासून बंद

पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणार

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.543 वरील कुरखेडा ते कोरचीदरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आली आहे. परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होऊ शकतो किंवा पुराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक 29 जूनपासून 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वळती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले.

पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाच्या वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.543) या रस्त्याचा तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा- आरमोरी- वैरागड मार्ग (रा.म.क्र.363)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.543) या पर्यायी मार्गाचा वापर करावा. याची अंमलबजावणी न करणाऱ्‍या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना असेल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.