अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील आरेंदा फाटा ते ताडगुडा या दुर्गम भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या पक्क्या रस्त्याचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. ग्रामीण विकासासाठी गावखेड्यातील सर्व रस्ते मुख्य मार्गांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी ना.आत्राम यांनी सांगितले.
पेरमिली मुख्य मार्गावरील आरेंदा फाटा ते ताडगुडा गावादरम्यानच्या 6 किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. आता आरेंदा व ताडगुडा येथील गावकऱ्यांना रस्ता सुलभ झाल्याने वाहतुकीसाठी होणारा त्रास व अडचण दूर झाली आहे.
याप्रसंगी बोलताना ना.धर्मरावबाबा म्हणाले, गावाच्या विकासासाठी रस्ते व दळणवळणाची सोय अत्यावश्यक आहे. गावखेड्यातील रस्ते मुख्य मार्गांशी जोडण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश ग्रामीण भागातील रस्ते बनविण्यात आले असून शिल्लक व उर्वरित रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न व शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रामुख्याने अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, येरमणारच्या माजी सरपंच बालाजी गावडे, आरेंदाचे सरपंच व्यंकटेश तलांडी, उपसरपंच बुज्जी आत्राम, ग्रा.पं.सदस्य मुरा आत्राम, मांतया आत्राम, सुरेंद्र अलोणे, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, साधू आत्राम, राजू तलांडी, मादी आत्राम, तसेच आरेंदा येथील गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.