Home पब्लिक प्रॉब्लेम आजपासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह, प्रत्येक गावात, शाळेत होणार तपासणी

आजपासून सिकलसेल नियंत्रण सप्ताह, प्रत्येक गावात, शाळेत होणार तपासणी

जिल्ह्यात 41,258 सिकलसेल वाहक

गडचिरोली : राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबविला जाणार आहे. यामध्ये नियमित व विशेष गावनिहाय, शाळानिहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 41 हजार 258 सिकलसेल वाहक आणि 2 हजार 978 सिकलसेलग्रस्त रुग्ण आहेत.

सिकलसेलग्रस्त रुग्णांचे सिकलसेल क्रायसिस, तीव्र रक्तक्षय व आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे. या रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हायड्रोक्सियुरिया हे औषध सर्व रुग्णांना सुरु करण्याचे ध्येय आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 929 रुग्णांना हायड्रोक्सियुरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्यात उत्कृष्ट असा बदल झाला आहे.

याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसुतीदरम्यान सिकलसेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किंवा रुग्ण आढळल्यास त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून सिकलसेल असलेल्या जोडप्याचे 20 आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण तर नाही हे जाणून घेता येते. त्यातून जोडप्यांना गर्भपातासाठी समुपदेशन केले जाते. यासाठी जिल्ह्यात संकल्प फाऊंडेशन आणि क्र्सना डायग्नोस्टिक्स कार्यरत आहेत.

ऑक्टोबर 2018 पासून जिल्ह्यात एकूण 11 हजार 549 गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्यापैकी 126 स्त्रिया सिकलसेल वाहक म्हणून, तर 17 जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले. अश्या सर्व 17 स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे . या 17 पैकी 3 स्त्रियांचे होणारे अपत्य हे सिकलसेल रुग्ण असेल असे आढळून आले. त्यापैकी 2 जोडप्यांनाही होणारे अपत्य सिकलसेल रुग्ण होऊ नये व त्यांनी आयुष्यभर यातना सोसू नये म्हणून वैद्यकीयरित्या गर्भपात करण्यात आले. याच अनुषंगाने जिल्ह्यात नवीन जन्माला येणारे बाळ सिकलसेल आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये (रुग्णालयांत) सिकलसेल वाहक असलेल्या जोडप्यांची गर्भजल तपासणी सुरु केली जाणार आहे.

नवजात बालकाला सिकलसेल आजार तर नाही, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकांची जन्माच्या 72 तासांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी हिंद लॅब मार्फत प्रत्येक आरोग्य संस्थेत सुरु करण्यात येणार आहे. सन 2023 पासून एकूण 8859 नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात सर्वच नवजात बालकांची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थेत करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.

सिकलसेल हा आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणून लग्नापूर्वी तपासणी आणि 2 सिकलसेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणून प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी समुपदेशन करत आहेत. उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा करता येईल.

जिल्ह्यात सिकलसेलचे नवीन रुग्ण होऊ नये व असलेल्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग तत्पर आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रणासाठी ‘पथ’ आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली.