महिलावर्गाशी छेडखानी करणाऱ्यांना त्यांची ‘जागा दाखवा’ अभियान

गडचिरोली बस स्थानकावर जनजागृती

गडचिरोली : 25 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत जागतिक स्री हिंसा विरोधी पंधरवडा राबविला जात आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विविध माध्यमातून होणाऱ्या महिलावर्गाच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी मंगळवारी (दि.10) गडचिरोली बस स्थानकावर ‘जागा दाखवा’ अभियान राबविण्यात आले. यात विविध पोस्टरच्या माध्यमातून बस स्थानकावरील मुली आणि महिलांना लैंगिक छळापासून बचावासाठी आणि काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात माहिती देण्यात आली.

मुंबईतील अक्षरा संस्था आणि कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या संचालिका डॅा.शुभदा देशमुख, प्रोजेक्ट असोसिएट उत्तरा चौरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी विविध फलकं हाती घेऊन महिलांचे लक्ष वेधून घेतले. वेगवेगळे हिंसेचे प्रकार काय आहेत याची माहिती यावेळी पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आली. याशिवाय या भागातील महिलांना त्यातील कोणत्या प्रकारच्या हिंसेचा अनुभव आला याचीही नोंद घेण्यात आली. तसेच सर्व्हेक्षणाच्या माध्यमातूनही काही नोंद घेण्यात येत असल्याचे उत्तरा चौरे यांनी सांगितले.

छळ होत असेल तर गप्प बसू नका. छळ करणाऱ्याला विरोध करा. कोणी या विरोधासाठी पुढाकार घेत असेल तर त्याला साथ द्या. त्रास होणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावून जा, असे आवाहन यावेळी महिलांना उद्देशून करण्यात आले.

संस्थेकडून मागील 18 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून बुधवारी कुरखेडा, तर गुरूवारी ब्रह्मपुरी येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे डॅा.शुभदा देशमुख यांनी सांगितले.