सती नदीवरचा पूल आणि कुरखेडातील राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले अडचणीचे

आ.गजबे यांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना

कुरखेडा : पावसाळ्याला सुरूवात होत असतानाही कुरखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीवरील मोठ्या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात पुलाअभावी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ.कृष्णा गजबे यांनी पुन्हा एकदा या कामांना भेटी देऊन पाहणी करत या कामांना गती देण्याची आणि पावसाळ्यात वाहतुकीला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंत्राटदारांना दिल्या.

रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकण्याचे काम जलदगतीने पूर्ण करून पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची व्यवस्था करण्याचा अशा सूचना आमदार गजबे यांनी दिल्या. तसेच कुरखेडा-कोरची मार्गावरील कुरखेडा शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पूलाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पुलाच्या बाजूने तात्पुरता पण मजबूत रपटा तयार करून पावसाळ्यामध्ये वाहतुकीला अडथळा येऊ नये याकरिता व्यवस्था करण्याची सूचना आ.गजबे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता लिंगावार यांना केली.

यावेळी शहर विचार मंच कुरखेडाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, देसाईगंजचे माजी न.प.उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, राम लांजेवार, डॉ.सतीश गोगुलवार, केशव गुरनूले, नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू हूसैनी, माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, नगरसेवक अॅड.उमेश वालदे, सागर निरंकारी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अयुब खान, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, तसेच शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.