अबब ! कालव्याच्या कामाला महिनाभरात पडल्या भेगा, लायनिंगचे काम निकृष्ट

इटियाडोहचे पाणी मध्येच मुरणार

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुरळीतपणे पाणी पोहोचण्यासाठी इटियाडोह प्रकल्पाच्या कालव्यांची दुरूस्ती करण्यात आली. परंतू गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा भागात केलेल्या लायनिंगच्या कामाला अवघ्या महिनाभरातच भेगा पडल्या आहेत. त्यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब लक्षात येऊ नये म्हणून त्या भेगा बुजवण्यातही आल्या, परंतू पुन्हा भेगा पडून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत धरणाचे पाणी पोहोचणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

कोंढाळा येथील मायनर क्रमांक 1 आणि 2 येथे इटीयाडोह प्रकल्प विभागाकडून काम करण्यात आले. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे कोंढाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणने आहे. इटियाटडोह धरणाचे पाणी गडचिरोलीतील शेतकऱ्यांना पुरवठा करण्यासाठी या कालव्यांचा फायदा होतो. पण या लायनिंगच्या कामाला जागोजागी भेगा पडल्याने ते पाणी शेतात पोहोचण्याआधीच मुरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.