गडचिरोली : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी असली तरीही येत्या 15 मे नंतर पारा पुन्हा चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानाचा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या उष्माघातजन्य आणि इतर आजारांचा सामना करताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वॅाटर बेल’ (Water Bell) संकल्पनेचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेमध्ये प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण उत्तम ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज सरासरी किमान 4 ते 5 लिटर इतके पाणी पिणे आवश्यक आहे. लहान मुले, आजारी व्यक्ती यांनी देखील मुबलक प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थी, शेतकरी व इतरांना बऱ्याचदा व्यस्त कामकाजामुळे तहान लागली असली तरी देखील पाणी पिण्याचा विसर पडताना आढळून येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास व बराच वेळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास उष्माघाताचे विविध आजार होउन गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना तात्काळ न केल्यास प्रसंगी मृत्यू देखील ओढवू शकतो. या सर्वांवरील सोपा उपाय म्हणजे दर तासाला किमान 1 ग्लास (100 ते 150 मिली) एवढे शुद्ध पाणी पिणे व त्यात सातत्य राखणे होय, जेणेकरुन शरीरात जलशुष्कतेची परिस्थीती उद्भवणार नाही.
आपल्या आरोग्याबाबत सर्वांनी सजग राहणे गरजेचे असून आपले कार्यालय, आपल्या अधिनस्थ सर्व शासकीय संस्था तसेच याव्यतिरिक्त इतर शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, आपल्या कार्यक्षेत्रात येणारी सर्व कार्यालये, सर्व अंगणवाडी, सर्व शाळा या ठिकाणी दर 1 तासाला बेल वाजवुन किंवा सार्वजनिक पुकारा करुन पाणी पिण्याबाबत सुचित करावे, अशा सूचना सीईओ आयुषी सिंह यांनी दिल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.