सिरोंचा : तालुक्यातील जानमपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत रामंजपूर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
रामंजपूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गावात नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची त्यांची मागणी होती. माजी जि.प. अध्यक्ष भाग्याश्री आत्राम यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रमातून सदर गावाला नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली. त्यामुळे त्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आता गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा मिळणार असल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सरपंच मधुकर आत्राम, उपसरपंच नागराज गणपतीवार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नगरसेवक रंजित गागापूरवार, रवी सुलतान तसेच रामंजपूर येथील नागरिक उपस्थित होते.