कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात अजूनही जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारच्या रात्री आंबेझरी या गावात हत्तींच्या कळपाने काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात पॅाईंट ऑफ इन्फॅार्मेशनच्या माध्यमातून याकडे सरकारचे लक्ष वेधले. वन विभागाने सदर नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना निकषातील ५ हजार रुपयांऐवजी जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. आमदार गजबे यांच्या या मागणीची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेतली.
कुरखेडा तालुक्यात हत्तींनी नुकसान केलेल्या घरांना ५ हजाराऐवजी सर्व्हेच्या आधारे नुकसानीची तीव्रता पाहून ९५ हजारापर्यंत मदत करण्याचे निर्देश वनसंरक्षक गडचिरोली आणि उपवनसंरक्षक, वडसा यांना दिले. त्यामुळे गजबे यांच्या मागणीला यश येऊन हत्तींनी नुकसान केलेल्या घरांसाठी लवकर आणि वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.