राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरपीडित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिरोंचा : गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुक्याला मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा फटका बसला. अशात एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर) तथा ऋतुराज हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तहसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्यांनी नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी आश्रय दिला होता. ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांना ठेवले होते, त्या ठिकाणी जाऊन पूरपीडित लोकांची विचारपूस करून त्यांना वेंकटलक्ष्मी आरवेल्ली यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंची मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, सामाजिक कार्यकर्ते आई कांता, नगरमचे सरपंच रमेश तोटा, सामाजिक कार्यकर्ते चंदू पडाला आदी होते.