अहेरी : तेलंगणानंतर भामरागड वनविभागाच्या हद्दीतही दोघांचे बळी घेऊन दहशत पसरविणाऱ्या हत्तीच्या मागावर वनविभागासह हुल्ला टिमही आहे. याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने हत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा टस्कर (नर) हत्ती ड्रोन कॅमेऱ्यांनाही हुलकावणी देत जंगलातून वाट काढत छत्तीसगडच्या दिशेने आगेकुच करत आहे. त्याच्या विष्ठेवरून त्याचा माग काढण्यात येत असल्याचे भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेष मीना यांनी सांगितले. दरम्यान या हत्तीने ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान केले त्यांची माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत देत दिलासा दिला.
या हत्तीने अहेरी तालुक्यातील कोरेली येथील दस्सा कोहला मडावी या शेतकऱ्याच्या घराचे नुकसान केल्याने भाग्यश्री आत्राम यांनी अतिदुर्गम कोरेली गाव गाठत शेतकऱ्याला आर्थिक मदत केली. या हत्तीने तेलंगणातून परतल्यानंतर अहेरी तालुक्यातील चिरेपल्ली, कोत्तागुडम, ताडगूडा, कोरेली आदी गावात पिकांसह घरांचेही नुकसान केले. त्यानंतर सदर रानटी हत्ती भामरागड तालुक्यात दाखल झाला. या दरम्यान त्या हत्तीने या भागातील नागरिकांचे अतोनात नुकसान केले.
छत कोसळलेल्या अवस्थेत म्हातारी रात्रभर खाटेवर
हत्तीने तीन दिवसांपूर्वी आरेंदा जंगलातून पेरमेली गावातील तलावाजवळून कोरेली जंगलात प्रवेश केला. तेथील शेतातील घरावर हत्तीने हल्ला करून घर पाडले. त्या घरात ७५ वर्षाची आजारी म्हातारी झोपून होती. सुरुवातीला हत्तीने म्हातारी झोपून असलेल्या घरावर हल्ला केला व त्यानंतर बाहेर झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी वेळीच गावाकडे धाव घेतल्याने ते सुदैवाने बचावले. दरम्यान कवेलूचे छत म्हातारीच्या अंगावर कोसळले. ती म्हातारी रात्रभर तिथेच बसून होती. नंतर गावातील नागरिकांनी धाव घेऊन म्हातारीला बाहेर काढले. मात्र तेव्हापर्यंत रानटी हत्तीने घराचे छत, कवेलू, साहित्य, भांडी, मोहा, धानाची नासधूस केली होती.
याची माहिती मिळताच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी कोरली गाव गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत करत शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.