ते बाहेरगावी लग्नकार्यात व्यस्त होते, अन् इकडे त्यांचे घर धगधगत जळत होते

रेगुलवाहीतील कुळमेथे कुटुंबातील ट्रॅजेडी

अहेरी : तालुक्यातील रेगुलवाही येथील सिद्दु कुळमेथे आणि राकेश कुळमेथे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास घडली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या कवेत गेल्याने संपूर्ण घर जाळून खाक झाले. यात कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे कुळमेथे कुटुंब बाहेरगावी लग्नकार्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली.

घरात कोणीही नसताना अचानक आग लागल्यानंतर घरातील संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाले. यात कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुळमेथे कुटुंबाला शासनाकडून मदत करावी, अशी मागणी केली. तसेच कुळमेथे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंसाठी आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सरपंच लिंगा वेलादी, श्रीनिवास तलांडे, गणपत नैताम, सिद्दू कुळमेथे, भगवान गावडे, मुत्ता मडावी, किस्टा नैताम, कमला नैताम, जग्गू कुळमेथे, प्रभाकर पेंदाम, कार्तिक तोगमसह परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.