गडचिरोली : गेल्या दिड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने आता चक्क गडचिरोलीच्या दिशेने आगेकुच सुरू केली आहे. गुरूवारी या हत्तींचे अस्तित्व नवरगाव- पोर्ला भागात होते. रात्रीच्या सुमारास हे हत्ती आणखी पुढे गडचिरोलीच्या दिशेने वळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे वनविभागाचे टेन्शन आणखीच वाढले आहे.
विशेष म्हणजे एरवी जंगलातील विविध झाडांची पाने आणि गवतावर ताव मारणारे हे हत्ती सध्या फुलोऱ्यावर आलेल्या धानपिकाचा फडशा पाडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे. या हत्तींनी काही दिवसांपासून कुरखेडा, आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले.
या हत्तींच्या कळपाने बुधवारी संध्याकाळी देलोडा मार्ग ओलांडला. यावेळी मार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चाहूल लागताच त्यांनी अलिकडेच गाडी थांबवून सावधपणे त्यांचा व्हिडीओ काढला. या कळपाचा हा आतापर्यंतचा सर्वात जवळून घेतलेला व्हिडीओ मानला जातो. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आ.कृष्णा गजबे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल परिसरातील शेतशिवारात रानटी हत्तींनी धान पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी केली. याची माहिती मिळताच आ.कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांना पंचनामा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर धारणे, ओमकार मडावी, शेखर धंदरे, पुंडलिक मानागडे, श्यामराव मंगरे, कैलास गोहणे, किशोर भोयर, रुमाजी खेवले, गुनेश्वर बानबले, योगाजी मेश्राम, किरण घोडाम तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.