राजनगरी अहेरीत २० ला हास्यकल्लोळ, दिग्गज कलावंत खळखळून हसविणार

- नृत्यांचा नजराणाही, काय आहे औचित्य?

अहेरी : जिल्ह्याच्या दक्षिण भागाचे राजकीय केंद्र, राजनगरी अहेरी येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ सादर होणार आहे. या कार्यक्रमात टिव्हीवरच्या हास्य मालिकांमधील दिग्गज कलावंत खळखळून हसविणार आहे. एवढेच नाही तर प्रसिद्ध नृत्यांगणा नृत्यही सादर करून नागरिकांचे मनोरंजन करणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन अहेरीत करण्यात आले आहे.

दरवर्षी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. याही वर्षी दिवसभर सामाजिक कार्यक्रम आणि रात्रीच्या सुमारास हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, सागर कारंडे, कमलाकर सातपुते, अंशिका चोणकर, तेजा देवकर, हेमलता बाणे, डॅा.सुधीर निकम, चैताली जावध आदी टीव्ही कलावंत प्रत्यक्षात अहेरीकरांसमोर आपली कला सादर करतील.

सदर कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास होणार आहे. या कार्यक्रमाचा अहेरी विधानसभेतील तमाम नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.