आरमोरी : शेतात मळणी केलेल्या धानाची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून घरी आणत असताना अचानक समोर आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने ट्रॅक्टरमधील ५० पोती धानाची नासधूस केली. ही घटना गुरूवारी (दि.२३) रात्री ९ वाजताच्या सुमारास डार्ली गावाच्या शेतशिवारात घडली. यावेळी ट्रॅक्टरसमोर चालत असलेल्या दुचाकीस्वार शेतमालकासह ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढल्यामुळे ते थोडक्यात बचावले.
प्राप्त माहितीनुसार, डार्ली येथील शेतकरी सदाशिव शंकर सडमाके यांचे गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेत आहे. शेतमालकाचा मुलगा विश्वनाथ भावाला घेऊन थ्रेशर मशीनने धानाची मळणी केल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये 50 पोती धान घेऊन घराकडे येत होते. त्याचवेळी शेतातच त्यांचा ट्रॅक्टर फसला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर फसलेला ट्रॅक्टर निघाला. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. ट्रॅक्टर पुन्हा फसू नये म्हणून विश्वनाथ हा दुचाकीने ट्रॅक्टरच्या पुढे-पुढे जात होता. त्याचवेळी विश्वनाथला समोरून रानटी हत्ती येताना दिसला. त्यामुळे त्याचे एकच भंबेरी उडाली. त्याने दुचाकी तिथेच ठेऊन ही माहिती ट्रॅक्टर चालकाला दिली. दोघांनीही ट्रॅक्टर व दुचाकी तिथेच ठेऊन कसाबसा घराकडे पळ काढला.
या प्रसंगाची माहिती त्यांनी गावात येऊन दिल्यानंतर गावातील काही नागरिकांनी रात्रीच शेतशिवाराच्या परिसरात जाऊन हत्तींना हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. सकाळी जाऊन पाहिल्यानंतर रानटी हत्तींनी ट्रॅक्टरमधील सर्व 50 पोत्यांमधील धान फस्त आणि नासधूस केल्याचे दिसून आले. त्यामुळे घरी काहीही धान पोहोचू शकला नाही. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. रानटी हत्ती आधी शेतातील धानाची, नंतर पुंजण्यांची आणि आता मळणी केलेल्या धानाचीही नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.