सुरजागड खाणीत रोजगार मिळून देणाऱ्या पोलिस पाटलाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला रोष

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या टिटोला गावचे पोलिस पाटील लालसू धिंग्रा वेळदा (55 वर्ष) यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाजवळ आढळला. त्यासोबत नक्षलवाद्यांनी एक पत्रकही ठेवले होते. त्यात लालसू यांच्या हत्येमागील कारण स्पष्ट करून इशाराही देण्यात आला.

गट्टा जांभीया पोलिस मदत केंद्रापासून 7 किमी पूर्वेकडे असलेल्या टिटोला गावातील पोलिस पाटील लालसू वेळदा यांनी परिसरातील गावकऱ्यांना सुरजागड लोहखाणीत रोजगार मिळवून दिला होता. दरम्यान गुरूवारी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आले. शुक्रवारी सकाळी गावाजवळ त्यांचा मृतदेह आणि नक्षली पत्रक आढळले.

लालसू हे गावातील ग्रामसभेच्या गोष्टी पोलिसांना सांगत असल्याचा आणि लोहखाणीत लोकांना काम मिळवून देत असल्याच्या रागातून त्याची हत्या केल्याचे त्या पत्रकातून दिसून येते. दरम्यान एकाच गावातील 10 ते 12 जणांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतू टिटोला गावच्या पोलिस पाटलाच्या हत्येशिवाय अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.