गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या आणि अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील निरपराध इसम रामजी आत्राम यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर जनमिलिशियाला अटक केली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
उपविभाग जिमलगट्टाअंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा जंगल परिसरामध्ये दामरंचा पोलीस व सीआरपीएफ जी-9 बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आली. पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याचे नाव प्रमोद मधुकर कोडापे (37 वर्षे) असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. मागील वर्षी दि.24/11/2023 रोजी मौजा कापेवंचा येथील रामजी आत्राम यांच्या खुनात त्याचा सहभाग होता.
अधिक तपासात कोडापे याने या आधीसुद्धा अनेक कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच तसेच त्यांने राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन पोलिसांविरुध्द कट रचने, नक्षल सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता. महाराष्ट्र शासनाने प्रमोद कोडापे याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ कमांडंट 9 बटा. शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.