गडचिरोली : छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये अनेक चकमकींमध्ये सहभागी असलेल्या आणि अनेक गुन्ह्यांत दोन्ही राज्यातील पोलिसांना हव्या असलेल्या जहाल महिला नक्षलीने गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले. संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता (40 वर्ष), रा.तुर्रेमरका, पो.लाहेरी, ता.भामरागड असे तिचे नाव आहे.
सन 2007 मध्ये छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ती नक्षल चळवळीत सहभागी झाली होती. ती आता एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 7 गुन्हे, जाळपोळीचा एक, तर खुनाचे 7 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तिच्यावर 6 लाखांचे इनाम ठेवले होते. नक्षल चळवळीत भ्रमनिरास झाल्याने तिने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला.
सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 37 बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात आली. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना लोकशाही मार्गाने सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.