पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न, आरोपीला सात वर्षांची शिक्षा

न्यायालयाची भिंत ओलांडताना पकडले

गडचिरोली : गंभीर दुखापत करण्याच्या गुन्ह्यात (कलम 324) न्यायालयीन कोठडीत असताना आरमोरी येथील न्यायालयात तारखेवर हजर राहण्यासाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, मात्र अशा पद्धतीने पळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश विकास कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.

अजय अरुण हजारे असे आरोपीचे नाव असून तो आरमोरी तालुक्यातील डोंबरी या गावातील रहिवासी आहे. भादंवि कलम 324 अन्वये अटक झाल्यानंतर तो एमसीआरमध्ये होता. यादरम्यान त्याला 5 मार्च 2020 रोजी आरमोरीच्या न्यायालयात तारखेवर हजर करण्यासाठी आणले होते. पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पोहवा भाऊचंद गेडाम, अंमलदार नितेश चांदेकर आणि वाहनचालक हे आरोपीसह प्रतीक्षालयात बसलेले असताना आरोपी अजय हा हातकडीसह हिसका मारुन पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊ लागला. पोलिस अंमलदार नितेश चांदेकर आरोपीस पकडण्यासाठी धावला असता आरोपीने न्यायालयातील तळ मजल्यावर असलेल्या भिंतीच्या लोखंडी रॉडला हिसका देवून ते तोडले. दरम्यान वाहन चालक पिरमोहम्मद शेख तसेच कोर्ट मोहरर पोअं नागरगोजे व मंगेश डोनाडकर रा.कुरुड यांनी आरोपी अजय अरुण हजारे याला न्यायालयाच्या वॉलकंपाऊंडवरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले आणि न्यायालयात पेश केले.

या अपराधासाठी त्याच्यावर कलम 332, 224, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला कलम 224 अन्वये दोन वर्षे शिक्षा, कलम 332 मध्ये तीन वर्षे शिक्षा, तसेच कलम 427 मध्ये 2 वर्षे शिक्षा अशी एकूण सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील एस.यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्राचा तपास पोहवा गौतम चिकनकर यांनी केला.