जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बाबतीत होत आहे मुलभूत अधिकारांचे हनन

बालकाच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांचे निवेदन

गडचिरोली : पेरमिली आरोग्य केंद्रांतर्गत एका दुर्गम गावातील आर्यन तलांडे या 4 वर्षीय बालकाचा पोटात दुखण्याच्या आजारामुळे आणि वेळेवर आरोग्य सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आरोग्य केंद्रातून अहेरीच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर केले पण रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने बसने पाठविण्यात आले. यात वेळ जाऊन बालकाचा उपचाराआधीच मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेतील कमतरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सुविधा, अर्थात आरोग्याचा हक्क हा मुलभूत अधिकार दिलेला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात या अधिकारांची नेहमीच पायमल्ली होत असल्याने त्यात तातडीने सुधारणा करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी संजय दैने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात केलेल्या मागण्यांमध्ये आर्यन तलांडे या बालकाच्या मृत्यूची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, जिल्हाभरात लोकसंख्येनुसार पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, लोकसंख्येनुसार पुरेसा प्रमाणात आरोग्य सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढविण्यावर भर द्यावा, रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या एजन्सीची सेवा स्थगित करून योग्य पद्धतीने सेवा द्यावी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखाने बंद करण्यात यावे आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

येत्या 10 जुलै 2024 पर्यंत या मागण्या पूर्ण करून आरोग्य सेवेतील कमतरता दूर करावी अन्यथा पुढील प्रक्रिया करणार असल्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना सुरज कोडापे, सुरज पाल, संदीप चरडुके, जीवन सडमेक, विकास चरडुके, सुमेध टेंभुर्णे, मनीषा मडावी, अन्नपूर्णा मेश्राम, मालता पुडो, जयश्री येरमे, रेखा तोडासे, वनिरत्राम येरमे, रोहिणी मसराम, माधुरी पडोती आदी उपस्थित होते.