गडचिरोलीत अनधिकृत सावकारी, सहकार विभागाकडून कारवाई

घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील योगेश महेंद्र रणदिवे यांच्या प्रतिष्ठानावर सहकार विभागाने अनधिकृतपणे सावकारी करत असल्याप्रकरणी छापा मारला. त्यांच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधकांनी (सहकारी संस्था) ही कारवाई केली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये जिल्हा उपनिबंधक व्ही.पी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून हा छापा मारण्यात आला. यात अनेक नियमबाहय दस्तावेज / कागदपत्रे (कोरे चेक, मुळ करारनामे, पैशाचे बदल्यात मालमत्ता खरेदीचे करारनामे इत्यादी) आढळून आली. ती पुढील कारवाईसाठी जप्त़ करण्यात आली आहे.

सदर धाडसत्रात पथक प्रमुख एच.जी. सौलाखे, तथा कर्मचारी डी.एस. बनसोड, हेमंत जाधव, प्रशांत गटकोजावार, अनिता हुकरे, एस.एम.वैद्य तथा पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चौकशी समिती नियुक्त़ करण्यात आली. सदर समिती सखोल चौकशी करुन पुढील कारवाई करणार आहे.

बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली तसेच तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विक्रमादित्य सहारे यांनी केले आहे.