गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाची अपरिमित हाणी झाली आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुणाची उणीव भरून काढणे अवघड आहे, अशा शोकसंवेदना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष तथा आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी व्यक्त केल्या.
स्व.मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 7 डिसेंबर रोजी धानोरा मार्गावरील गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी समाजाच्यावतीने श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शेडमाके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.पिचड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शेडमाके यांनीही स्व.मधुकरराव पिचड यांच्या आठवणी जाग्या करून त्यांच्या नेतृत्वास समाज पोरका झाला अशा शोकसंवेदना व्यक्त केल्या.
यावेळी नागोराव उईके, श्रीनिवास कोडाप, जंगल कामगार सहकारी संस्थेचे सचिव सचिन मेश्राम, गुरूदेव नैताम, मधुकर कन्नाके, तेजेश्वर नेवारे, सचिन आत्राम, महिला आघाडीच्या महासचिव विद्या मडावी, सचिव मृणाली मडावी, प्रतिक्षा कोडापे, रोहीणी उईके, पुष्पा मडावी, पायल कोडापे, माया मडावी आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.