रेती तस्करीतील एक ट्रॅक्टर पकडला, दुसरा तलाठ्याला ढकलून पळाला

देसाईगंज महसूल प्रशासनाची कारवाई

देसाईगंज : तालुक्यातील ग्रामीण भागात कुरुड, कोंढाळा या भागातून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याने तालुक्याचे महसूल प्रशासन अधूनमधून कारवाया करत असते. अशातच 30 मे च्या मध्यरात्री रेती तस्करांवर कारवाई करण्यात आली. मात्र यात एका ट्रॅक्टरला पकडण्यात यश आले, तर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मालकाने तलाठ्याला धक्का देऊन ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.

कुरुड परिसरातील रेती घाटांवरून रेतीची चोरी सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे तहसीलदार प्रीती डुडूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल निरीक्षक किशोर ठाकरे आणि तलाठी यांनी रात्रीच्या सुमारास रेती तस्करी करत असताना दोन ट्रॅक्टर पकडले. दोन ट्रॅक्टरवर दोन कर्मचाऱ्यांना बसवून ते तहसीलकडे नेत असताना दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मालकाने ट्रॅक्टरवर बसलेल्या तलाठी वनकर यांना धक्का देऊन खाली ढकलले आणि सुसाट वेगात ट्रॅक्टर पळवला. ट्रॅक्टरवर बसलेल्या वनकर यांना यामुळे किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती तहसीलदार प्रीती डुडूलकर यांनी दिली.