सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावयाला पाच वर्षांचा कारावास

दारूच्या व्यसनात केला चाकुने हल्ला

गडचिरोली : सासरी जाऊन दारूच्या नशेत आपल्या सासऱ्यावर चाकुने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावयाला जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. वैभव सखाराम गावडे, रा.सिदेसूर असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, धानोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चुडीयाल गावातील हिरामण सावजी ताडाम (५५ वर्ष) यांच्या मुलीचे (सपना) लग्न तीन वर्षापुर्वी सिदेसुर येथील आरोपी वैभव सखाराम गावडे याच्यासोबत आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. पण वैभवला दारु पिण्याची सवय असल्याने त्या दाम्पत्यात नेहमी भांडण होत होते. भांडण झाल्यावर गावपातळीवर पंचायत भरवून भांडणे अनेकवेळा मिटवण्यात आली. तरीही आरोपी वैभवच्या वागणुकीत सुधारणा न झाल्याने सपना तिच्या दोन मुलांना घेऊन माहेरी आली होती.

१२ सप्टेंबर २०२० रोजी आरोपीचे सासरे हिरामण ताडाम रात्री जेवण करुन झोपलेले असताना ९.३० वाजताच्या दरम्यान आरोपी वैभव हा तिथे आला. दारुच्या नशेत तो आपल्या मुलीला झोपेतून उठवुन मौजा सिंदेसूर येथे घेवून जातो असे म्हणत होता. यावेळी सासरे हिरामण यांनी सकाळी घेऊन जा, असे म्हटले असता जावई वैभवने तुला माझ्या पत्नीला व मुलांना ठेवण्याचा काही अधिकार नाही, म्हणत आपल्या खिशातुन धारदार चाकू काढला आणि सासऱ्याच्या गळ्यावर वार केला. यावेळी झालेल्या आरडाओरडीनंतर आरोपी पळून गेला.

याप्रकरणी धानोरा पोलिसांनी त्याला अटक करून सबळ पुरावे गोळा करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी आरोपीला कलम भादंवि ३०७ मध्ये दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा आणि ५००० रुपये दंड, आणि दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील निलकंठ भांडेकर यांनी कामकाज पाहिले. गुन्हाचा प्रथम तपास पोउपनि प्रशांत कुंभार व अंतिम तपास पोनि विवेक अहिरे यांनी केला.