नेहरू युवा केंद्राचे राज्य निर्देशक मनुरे यांची गडचिरोलीत सदिच्छा भेट

'युवा केंद्र सर्वांगिन विकासाचे प्रभावी माध्यम'

गडचिरोली : नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोवाचे राज्य निर्देशक प्रकाशकुमार मनुरे हे गडचिरोली येथे आदिवासी युवा आदान-प्रदान प्रस्थानच्या कार्यक्रमासाठी गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन युवा स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा युवा केंद्राचे अधिकारी अमित पुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत अलिबागचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला हेसुद्धा उपस्थित होते.

यावेळी मनुरे यांनी गडचिरोलीच्या युवा स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. नेहरू युवा केंद्र संघटन हे देशातील युवकांचे सर्वात मोठे संघटन असून त्या माध्यमातून अनेक युवकांच्या कलागुणांना वाव देण्यात येते आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव, युवा सांसद, युवा संवाद यासारख्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहरू युवा केंद्र कार्य करीत असल्याचे मत मनुरे यांनी व्यक्त केले.

यावेळी युवा स्वयंसेवक अनुप कोहळे, तालुका समन्वयक सुरज चौधरी, पंकज लाडे, प्रियंका दहिकर, जयश्री प्रधान, सपना लाडे, प्रतीक्षा सिडाम, पुजा निंदेकर, इशिका देठेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनुप कोहळे यांनी केले.