गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाया करण्याचा कट आखण्यासाठी जमलेल्या नक्षलवाद्यांचा कॅम्प पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेकडील गडचिरोलीच्या जंगलात ही चकमक उडाली. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 पथकाच्या 22 तुकड्या आणि सीआरपीएफच्या 2 तुकड्यांनी ही कारवाई केली.
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात विध्वंसक कारवाया आणि घातपात घडविण्याचा आणि त्यातून निवडणुकीत अडथळे आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक नाही. त्यामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा हिंसक कारवाया करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात वापर केला जाण्याची शक्यता पाहता पोलीस आधीच अलर्ट होते. मागील दोन दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचन्याच्या तयारीत असून ते गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेलगत कोपर्शीच्या (तालुका भामरागड) जंगलात असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाच्या 22 तुकड्या आणि सीआरपीएफच्या शिघ्र कृती दलाच्या 2 तुकड्या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबविण्याकरिता रवाना करण्यात आल्या. जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले, परंतु माओवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस पथकाला दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला. या अभियानात 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.
या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात नक्षलवाद्यांची शोधमोहीम सुरूच आहे. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.