परतीच्या पावसाने कापलेले धान पाण्यात, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

पंचनामे करण्यासाठी वेळ मिळेल का?

गडचिरोली : दोन दिवसात गडचिरोली तालुक्यासह देसाईगंज आणि जिल्ह्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या जोरदार पावसात शेतकऱ्यांचा कापून ठेवलेला शेतातील धान पाण्यात भिजला. यामुळे हा धान वाया जाण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतात उभ्या असलेल्या धानाचेही नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, मात्र महसूल विभागाचे कर्मचारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे तत्काळ पंचनामे होतील का, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

गडचिरोली तालुक्यातल्या बोदली भागात पावसामुळे बरेच नुकसान झाले. मुख्य पीक असलेला धान मळणीआधी वाळवण्यासाठी शेतातच कापून ठेवलेला होता. पण अचानक झालेल्या वादळी पावसापुढे शेतकऱ्यांना नाईलाज झाला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी जमले होते. त्या पाण्यात कापलेले धानपीक राहिल्याने ते खराब होण्याची दाट शक्यता आहे.

पंचनामे करण्याचे आ.गजबे यांचे निर्देश

आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चारही तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतपिकाचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी चारही तालुक्यातील तहसीलदारांना दिले.

आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या धानोरा, आरमोरी, कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात 19 ऑक्टोबर 204 रोजी झालेल्या परतीच्या पावसाने उभ्या धान पिकाचे तसेच कापलेल्या धान पिकावर पाणी जाऊन पिक पाण्याखाली आल्याने ते सडून बरेच नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची उपजिवीका धान पिकावर आहे. हे पिक ऐन भरात असताना व मळणीसाठी पिकाची कापणी करण्यात आली असताना कडपा पाण्याखाली येऊन धान सडल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासकीय स्तरावरुन शेतपिकाचे एक रुपयात पीकविमा काढण्यात आल्याने प्रमाणापेक्षा अधिक नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देय आहे. ही भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असल्याने नुकसानग्रस्त शेतपिकाची तत्काळ मोका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गजबे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.