अतिक्रमणाच्या विळख्याने मुलचेरा तालुक्यात घनदाट जंगल होत आहे भुईसपाट

वन आणि वनजमीन वाचवण्यासाठी कोण धावणार?

गडचिरोली : आलापल्ली वन विभागाअंतर्गत पेड्डीगुडम परिक्षेत्रामधील मुलचेरा तालुक्यात वनजमिनीला अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यांच्यावर हे अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी आहे ते वनविभागाचे संबंधित अधिकारी मूग गिळून बसले आहेत. अशा स्थितीत अतिक्रमणधारकांच्या तावडीतून वन आणि वनजमीन हे दोन्ही वाचवण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विपुल वनसंपदेकरिता प्रसिद्ध असलेल्या आलापल्ली वनविभागातील पेड्डीगुडम वनपरिक्षेत्र 33602.858 हेक्टर वनक्षेत्रावर विस्तारले आहे. या वनपरिक्षेत्रात मुलचेरा, गोमणी, येलचिल व मुकडी उपक्षेत्राचा समावेश आहे. सन 70 ते 80 च्या दशकात तत्कालीन सरकारने या भागात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी बंगाली समुदायाच्या लोकांना आश्रित म्हणून या भागात आणून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी थोडी-थोडी वनजमीन दिली होती. त्या काळात पेड्डीगुडम हे घनदाट वनक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. पण बदलत्या काळासोबत या भागातील जंगलही नष्ट होत गेले. आज या भागातील वनजमीन मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात फसत आहे. असे असताना वनपरिक्षेत्र अधिकारी ते उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणीच सदर वनजमीन वाचविण्याकरिता प्रयत्न करताना दिसून येत नाही. यामागे त्यांची अशी कोणती अपरिहार्यता आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुलचेरा, मुकडी, मुकडीटोला, बंदुकपल्ली, तरुणनगर, मोहर्ली, उदयनगर, आंबटपल्ली, गोविंदपूर कोपर्ली, मल्लेरा, लोहार भवानीपूर, श्रीरामपूर, फुसकीचाल, भगवंतनगर आदी गावांमध्ये वाटप करण्यात आलेली वनजमीन आणि प्रत्यक्षात कसण्यात येत असलेल्या वनजमिनीची पाहणी केल्यास किती मोठ्या प्रमाणावर वनजमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे हे दिसून येईल. गुगल मॅपिगवरही या अतिक्रमणाचे चित्र दिसत आहे. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे.

केवळ आर्थिक लाभासाठी मौल्यवान वन आणि त्यावरील वनसंपदा अतिक्रमणधारकांच्या घशात घालणारे अधिकारी रेतीचे ट्रॅक्टर, विटाभट्ट्यांची वसुली, सरपन आणणाऱ्या नागरिकांना मात्र कारवाईचा धाक दाखवून बिनापावतीचा दंड वसुल करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

‘कटाक्ष’च्या बातमीनंतर आलापल्ली वनविभाग झाला जागा

बुधवारी कटाक्षने पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रातील वृक्षतोडीची बातमी प्रकाशित केल्यानंतर आलापल्ली वनविभागाला जाग आली. सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानी पथकासह मुलचेरा-श्रीनगर-खुदरामपल्ली रस्त्यालगत झालेल्या वृक्षतोडीची पाहणी केल्याचे कळते. जमिनीपासून एक ते दोन फूट उंचावर तोडण्यात आलेले थुट पाहिल्यानंतर ही वृक्षतोड अवैध असल्याचे स्पष्ट करणारी आहे. आता या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.