आता कळू शकेल सिलिंडरमधील गॅस कधी संपणार, उपकरण विकसित

'गोंडवाना'च्या प्राध्यापकांना इंग्लंडकडून पेटंट

गडचिरोली : आपल्या घरातील स्वयंकापाचा गॅस कधी संपणार याची कल्पना आपल्याला नसते. अनेक वेळा स्वयंपाक करता-करता अचानक सिलिंडरमधील गॅस संपतो. मग धावपळ करत दुसरा सिलिंडर लावला जातो. दुसरा सिलिंडर तयार नसेल तर स्वयंपाक अर्धवट सोडण्याचीही वेळ येते. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या काही सहायक प्राध्यापकांनी सिलिंडर किती शिल्लक आहे हे दर्शविणारे उपकरण विकसित केले आहे. विशेष म्हणजे त्याला इंग्लंडकडून (यु.के.) आंतरराष्ट्रीय पेटंटसुद्धा मिळाले आहे.

फेडरल रिपब्लिक ऑफ युनायटेड किंगडम (UK) कडून गोंडवाना विद्यापीठातील संगणक विभागात कार्यरत सहायक प्रा.डॉ.मनीष विलास देशपांडे, डॉ.कृष्णा दीनानाथ कारू, मेघराज माणिकराव जोगी, विकास आत्माराम चित्ते यांना आंतरराष्ट्रीय पेटंट प्रदान करण्यात आले. गॅस सिलिंडरच्या दाबानुसार नवीन सिलिंडरची गरज असे या प्रयोगाचे शिर्षक होते. रिफिलिंग प्रक्रिया अधिक सहज करणे हा या प्रयोगामागील उद्देश होता.

या उपयोगी संशोधानाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.चन्द्रमौली यांनी संशोधनकर्त्यांचे कौतुक केले.

हे उपकरण कसे काम करते?

जेव्हा १४.८ किलो वजन असलेले सिलिंडर रिकामे असते तेव्हा सदर उपकरण अलार्म ट्रिगर करतो आणि लाल दिवा चमकतो. जेव्हा सिलेंडर भरले असते म्हणजे वजन २९.० किलो आणि २.५ एटीएम (वातावरणाचा दाब) दाब दर्शवते तेव्हा सदर उपकरणावर हिरवा दिवा चमकतो. जेव्हा दाब मध्यभागी असेल तेव्हा सदर उपकरण संदेशासह पिवळा दिवा दाखवितो. हे उपकरण सिलिंडरचे वजन सतत मोजते. त्यामुळे जेव्हा सिलिंडरमधील गॅस किमान पातळीवर येऊन वजन कमी होते तेव्हा हे उपकरण अलार्म वाजून अलर्ट करते. या उपकरणामुळे सिलेंडर कधी संपणार याचा अंदाज येऊन ते पुन्हा भरण्यासाठी त्वरीत तरतूद करू शकतो.