गडचिरोली : भामरागड तालुक्यात असलेल्या नक्षल दहशतीचा फायदा घेत कुडकेलीच्या जंगलात चक्क बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यावर छापा मारत संबंधित आरोपींचे मनसुबे उधळून लावले. यात जवळपास 39 लाखांचा मुद्देमाल जप्त करत धुळे जिल्ह्यातील चार लोकांना अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, दक्षिण गडचिरोलीमधील ताडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात बनावट देशी दारु तयार करण्याचा कारखाना सुरु झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी स्थानिक गु्न्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल व प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रभारी अधिकारी पोनि.अरुण फेगडे, सपोनि.राहुल आव्हाड, सपोनि.भगतसिंग दुलत व त्यांच्या पथकासह, विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान त्या ठिकाणी रवाना करण्यात आले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जंगल परिसरातील त्या ठिकाणाला बुधवारच्या रात्री घेराव घातला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा व जंगलाचा फायदा घेऊन एक चारचाकी वाहनाने वेगाने ताडगाव ते आलापल्ली मार्गाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला असता, वाहन चालक कारखान्याच्या ठिकाणापासून 200 मीटर अंतरावर वाहन उभे करुन पळून गेला. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुचे बॉक्स दिसून आले. वीजेची सुविधा नसल्याने वाहन व कारखाना परिसरास योग्य तो घेराव घालुन रात्रभर सुरक्षित ठेवले. सकाळी (दि.15) पंचासमक्ष छापा कारवाई केली असता, लाखो रुपयांची बनावट दारु जप्त करण्यात आली. तसेच बनावट दारु बनविण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये खालीलप्रमाणे साहित्य होते.
* 15 प्लास्टिक ड्रममध्ये बनावट देशी दारु तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे स्पिरीट – 4500 लीटर (अंदाजे किंमत 13 लाख 65 हजार रुपये)
* 1000 लीटर क्षमतेचे 2 व 750 लीटर क्षमतेचा 1 बनावट देशी दारुने भरलेला ड्रम- (अंदाजे किंमत 8 लाख 25 हजार रुपये)
* 90 एम.एल. मापाच्या बनावट देशी दारुने भरलेल्या 8700 बाटल्या (अंदाजे किंमत 6 लाख 96 हजार रुपये)
* एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीचे चारचाकी वाहन (एमएच 46, ए.यु.2260, अंदाजे किंमत 4 लाख रुपये)
* एक ग्रे रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (एमएच 34, बीपी 6430- अंदाजे किंमत 60 हजार रुपये)
* किसान पॉवर गोल्ड कंपनीचे 7.5 एच.पी. कंपनीचे जनरेटर (अंदाजे किंमत 1 लाख रुपये)
* देशी दारुच्या बाटल्या सिलबंद करण्यासाटी वापरण्यात येणारी 5 नग सिलींग मशीन (अंदाजे किंमत 2 लाख 50 हजार रुपये)
* याशिवाय वायर, रॉकेट देशी दारु प्रवरा डिस्टीलरी प्रवरा नगर, असे लिहिलेले कागदी प्रिंटेड लेबल, जेट पंप, पाईप, ट्रे, प्लास्टीक कॅन, रासायनिक द्रव्य, खोके, बॅटरी, इन्व्हर्टर, बाटलीचे झाकण, रिकाम्या बाटल्या, ताडपत्री, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर इ. साहित्य (अंदाजे किंमत 2 लाख 35 हजार रुपये) असा एकुण 39 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
या घटनेच्या अनुषंगाने वसंत प्रदान पावरा (19 वर्षे), रा.बोराडी, जि. धुळे, शिवदास अमरसिंग पावरा (35 वर्षे), रा.धाबापाडा जि.धुळे, अर्जुन तोयाराम अहिरे (33 वर्षे), रा.धुळे आणि रविंद्र नारायण पावरा (18 वर्षे) रा.सलाईपाडा जि.धुळे यांना ताब्यात घेण्यात आले. पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. ताडगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सपोनि.भगतसिंग दुलत करीत आहेत.