कृषीचे व्हिजन डॅाक्युमेंट तयार करा, सहपालकमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोलीत खरीप हंगामपूर्व आढावा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चारोळी, काजू यासारख्या नवनवीन उत्पादनांच्या प्रयोगातून समृद्धी कशी आणता येईल यासाठी नियोजन करा आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी व्हिजन डॅाक्युमेंट तयार करा, असे निर्देश सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात यावर्षीच्या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खासदार डॅा.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम, माजी आ.कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प.सीईओ सुहास गाडे, सर्व उपविभागीय अधिकारी आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी प्रामु्ख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाचे सादरीकरण करताना विविध नवीन फलोत्पादनाच्या प्रयोगांची माहिती दिली. त्यावर ना.जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांकडून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या चारोळी, काजू यासारख्या फळपिकांबद्दलची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर त्या पिकांची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे त्यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.

लवकरच मिळणार शेतकऱ्यांना बोनस

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस लवकरच मिळणार आहे. त्यासंदर्भातील फाईल तयार आहे, अशी माहिती ना.जयस्वाल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

घरपोच मिळेल वाळू नेण्याची पास

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळू तस्करीबद्दल बोलताना त्यांनी ही स्थिती राज्यातच नाही तर देशात असल्याचे सांगितले. नुकत्याच आणलेल्या नवीन वाळू धोरणामुळे वाळू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, त्यातून काळाबाजार कमी होईल. विशेष म्हणजे घरकुलधारकांना वाळू नेण्याची पास कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता त्यांच्या घरपोच देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामात हयगय करणाऱ्या तहसीलदार, तलाठ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही सहपालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली जिल्ह्याला 31 मे पर्यंत नवीन खनिकर्म अधिकारी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.