गडचिरोली : जादुटोण्याच्या संशयातून महिला आणि पुरूषाची हत्या होण्याचे प्रकरण ताजे असताना त्याच एटापल्ली तालुक्यातील जांभिया गावातल्या 60 वर्षाच्या इसमालाही जादुटोण्याच्या संशयातून गरम सब्बलने चटके देऊन अमानुष अशी शिक्षा देण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांना एमसीआर मिळाल्याने त्यांची रवानगी चंद्रपूर कारागृहात करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचीही हकिकत जाणून घेतली. पीडित इसमासह त्याच्या मुलाने घडलेला प्रकार त्यांच्याजवळ कथन केला. मी जंगलाच्या दिशेने पळ काढत लपून बसलो. त्यांनी पाठलाग केला पण मी सापडलो नसल्याने वाचलो, असे मुलाने सांगितले.
या प्रकरणात जांभिया येथील पीडित व्यक्तीला खांबाला दोरीने हातपाय बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि शरीरभर गरम लोखंडी सब्बलने त्वचा जळेपर्यंत डागण्या देण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालयात संबंधित पिडीत व्यक्तीची व कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून घडलेला प्रकार जाणून घेतला. या घटनेत ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला त्यांच्या कुटुंबीयांकडून पिडीत व्यक्तीला व कुटुंबातील सदस्यांना तक्रार मागे घेण्यासाठी तगादा लावल्या जात आहे. एवढेच नाही तर, तक्रार मागे घेतली नाही तर तुम्ही या गावात कसे राहायला येता ते आम्ही पाहून घेऊ, अशा धमक्याही मिळत असल्याचे पीडित व्यक्तीच्या मुलाने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
अन् तो रात्रीच्या अंधारात जीव मुठीत घेऊन पळाला
पीडित इसमाची दोन्ही मुले बऱ्यापैकी शिकलेली आहेत. एक मुलगा घटनेच्या दिवशी घरी नव्हता. पीडित व्यक्तीची पत्नी देखील बाहेरगावी होती. घरी एक मुलगा व बाप हे दोघेच असल्याने ते दोघे रात्रीचे जेवण करून झोपलेले होते. यावेळी काही लोकांचा जमाव त्यांच्या दिशेने येत असल्याचे मुलाला दिसले आणि त्याने वडीलाला झोपेतून जागे केले. प्रकरणाचे गांभीर्य मुलाच्या लक्षात आले. आपल्याला हे लोक आता जीवंत मारल्याशिवाय राहणार नाही, असे समजून मुलाने तेथून मोटारसायकल घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. काही लोक त्याचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वळणावर गाडी बंद करून लगतच्या जंगलात नेऊन झाडाला आडवी टेकवून ठेवली आणि तो जंगलात खाली जमिनीवर झोपून गेला. मागून आलेल्या तीन-चार गाड्या एकामागून एक निघून गेल्यानंतर तो कसाबसा जीव वाचवून घरी परतला. त्यावेळी त्याच्या वडिलांना मरणयातना होत असल्याचे दृष्य त्याला दिसले. पोलिसांची मदत घेऊन त्याने वडिलांना दवाखान्यात भरती केले.