गडचिरोली : पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी छत्तीसगड सीमेवरील हिद्दूर गावाजवळच्या जंगलात चकमक झाली. यात कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. मात्र पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहून नक्षलवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घनदाट जंगलात पळ काढला.
छत्तीसगड सीमेकडील भागात गडचिरोली पोलिसांनी नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गर्देवाडा पोलिस मदत केंद्रांवर पाळत ठेवण्यासाठी नक्षलवादी त्या भागात आले होते. ते रेकी करत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे ही चकमक उडाली.
पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटकात वापरले जाणारे साहित्य जप्त केले. त्यात वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माईन्सचे हुक, सोलर पॅनल, पिट्टू बॅग अशा साहित्याचा समावेश आहे.
सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर, नारायणपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विध्वंसक कारवाया करण्यासाठी नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गर्देवाडा पोलिस मदत केंद्रात रेकी करण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाने शोध मोहीम सुरू केली. त्यांना हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर पोलिस पथकावर संध्याकाळी 7 वाजता नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. पोलिस दलाने सावध पवित्रा घेत त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले.
यानंतर परिसरात झडती घेतली असता नक्षलवाद्यांचे विविध साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.