जखमी टी-23 वाघाला शिवराजपूर भागातून उपचारासाठी केले पिंजऱ्यात बंद

दोन दिवसांपासून सुरू होता शोध

गडचिरोली : वडसा वनविभागांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर परिसरातील जंगलात जखमी अवस्थेत फिरत असलेल्या टी-23 या नर वाघाला गुरूवारी (दि.8) बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर वडसा येथे प्राथमिक उपचार करून नंतर गोरेवाडा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

5 फेब्रुवारीला रात्री सहायक वनसंरक्षक एम.एन.चव्हाण यांना एक वाघ जखमी असल्याची माहिती मोबाईलवर मिळाली होती. त्यामुळे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी रात्रीच शिवराजपूर ते उसेगाव रस्त्यावर जाऊन पाहणी केली असता एक वाघ लंगडत रस्ता ओलांडताना त्यांना आढळला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाघावर ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवली होती. या वाघाच्या समोरी उजव्या पायाच्या पंजावर दुखापत झालेली असल्यामुळे तो लंगडत चालत होता. तो शिकार करण्यासही असमर्थ असल्याचे आढळल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी ताडोबातील पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.रविकांत खोब्रागडे यांच्या चमुला पाचारण करण्यात आले. दोन-तीन दिवसांपासून या चमुकडून त्या वाघावर पाळत सुरू होती. गुरूवारी शिवराजपूर जवळच्या जंगलात तो आढळून आल्यानंतर त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागून ताब्यात घेण्यात आले.

गोरेवाडा येथे 10 दिवस त्याच्यावर उपचार केले जातील. 4 ते 5 वर्ष वयाच्या या टी-23 वाघाने आतापर्यंत मानवी जीवाला कोणतीही हाणी पोहोचवलेली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. पण त्याला कुठे आणि केव्हा सोडणार याबाबतचा निर्णय वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांकडून घेतला जाणार असल्याचे वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.