कोरची : तालुक्यातील बेतकाठीच्या जंगलातील झाडांची कटाई करून त्या लाकडांची तस्करी करणारी तीन वाहने वनविभागाच्या पथकाने पकडली. त्यात दोन मालवाहू वाहनांचा समावेश आहे. त्यातील लाखो रुपयांचे सागवान लाकडून जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात पथकाला यश आले. उर्वरित पाच आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील बेतकाठीच्या जंगलातून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होऊन लाकडांची तस्करी केली जात असल्याची माहिती बेडगाव वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बेडगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून रात्रीच्या वेळी कारवाईला सुरूवात केली. मात्र पथक आल्याची चाहुल लागताच आरोपींनी वाहनं तिथेच सोडून पळ काढला. यावेळी एक पिकअप आणि लाकडांनी भरलेला ट्रॅक्टर, तसेच एक दुचाकी वाहन पथकाच्या हाती लागले. तसेच सुरेश रामलाल होळी (25 वर्ष), रा.कुमकोट या आरोपीला अटक करण्यात आली.
ट्रॅक्टरमध्ये 2.665 घनमीटरचे सागवान लाकूड होते. त्याची किंमत अंदाजे 3 लाख 13 हजार रुपये आहे. पकडलेल्या तीनही वाहनांची किंमत 22 लाख 63 हजार इतकी असल्याची माहिती बेडगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. ठाकरे यांनी दिली.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांच्यासह बेतकाठीचे क्षेत्र सहाय्यक बी.एस. अवतरे, डी.आर. ढोरे, वनरक्षक एम.बी. कुंजाम, एस.डी. मसराम, जे.एम. चुरगाये, सी.एन. मडावी, एन.आर. मितलामी, व्ही.एस. कवडो यांनी केली.