गडचिरोली : वाहन खरेदीसाठी बेरोजगार युवकाला 10 लाखांचे कर्ज मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शबरी विकास महामंडळाच्या लेखापालास एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहाथ पकडले. रुपेश वसंत बारापात्रे (40 वर्ष) असे अटक केलेल्या रोखपालाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार युवक हा देसाईगंज तालुक्यातील कोरेगावचा रहिवासी आहे. त्याने माल वाहतुकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वाहन खरेदी करायचे असल्याने गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे 10 लाख रुपये कर्ज घेण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र तेथील कंत्राटी लेखापालाने त्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान त्या बेरोजगार युवकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार पडताळणी केल्यानंतर सापळा रचला आणि सोमवारी (दि.17) त्या युवकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना रोखपाल रुपेश बारापात्रे याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, एएसआय सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजेश पद्मगिरवार, नाईक स्वप्निल बांबोळे, संदीप घोरमोडे आदींनी केली.