गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी दारूबंदीच्या 49 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 6 लाख 80 हजार 450 रुपयांच्या दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर चालवून त्या नष्ट करण्यात आल्या. या कारवाईत विविध प्रकारच्या मद्यवर्गीय पेयांच्या छोट्या-मोठ्या मिळून तब्बल 7498 बाटल्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशान्वये ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. कोरची पोलिसांनी अशा 49 प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी मोठा खड्डा केला होता. खड्ड्याच्या उंचावरील भागात बाटल्या रचण्यात आल्या. त्यावर रोलर चालविल्यानंतर वाहत आलेली दारू त्या खड्ड्यात गोळा झाली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बाटल्यांचा चुराडा त्या खड्ड्यात टाकण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिलेल्या परवानगीनुसार कोरची ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांनी उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चं.वि. भगत यांच्यासमक्ष ही प्रक्रिया केली. यात देशी दारुच्या 180 मिली मापाच्या 449 बाटल्या, देशी दारुच्या 90 मिली मापाच्या 4047 बाटल्या, विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या 2609 बाटल्या, 650 मिली मापाच्या बियरच्या 202 बाटल्या, 500 मिलीच्या बियरच्या 130 टिन कॅन, 330 मिली मापाच्या बियरच्या 61 बाटल्या अशा एकूण 7498 बाटल्या नष्ट केल्या.