आजी-आजोबासह नातीची रहस्यमय हत्या, शेतातील थराराने हादरले गुंडापुरी गाव

नातेसंबंधातील वादाची किनार? पोलिसांचे संकेत

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी या दुर्गम गावात आजी-आजोबासह त्यांच्या १० वर्षीय नातीची हातोड्यासारख्या वस्तूने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी उघडकीस आली. मृत पती-पत्नी धान कापणीच्या कामासाठी सध्या शेतातच राहायला आले होते. त्यांची १० वर्षीय नात आजी-आजोबांना भेटण्यासाठी आली होती. हे तिघेही मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस मदत केंद्र येमली बुर्गी अंतर्गत गुंडापुरी गावातील शेतात देऊ दसरू कुमोती (60 वर्ष), त्यांची पत्नी बिच्छे देऊ कुमोती (55 वर्ष) आणि त्यांची नात अर्चना रमेश तलांडी (10 वर्ष) हे शेतातील झोपडीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.

या तिहेरी हत्याकांडाचा नक्षलवाद्यांशी संबंध असण्याची शक्यता नसून नात्यांमधील वादातून हे हत्याकांड घडले असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केली.

कुमोती दाम्पत्य धान कापणी आणि मळणीच्या कामासाठी सध्या त्यांच्या शेतातच राहात होते. त्यांचे मृतदेह पोलिस मदत केंद्र येमली बुर्गी येथे आणण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. लवकरच आरोपींना अटक होण्याचीही शक्यता आहे.