कमलापूर : कमलापूर हे गाव संवेदनशिल अशा दुर्गम भागात असून शासकीय हत्ती कॅम्पसाठी प्रसिद्ध आहे. पण या गावात देशी-विदेशी दारूचे अवैधपणे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे युवक वर्ग व्यसनाधीन होऊन घरांमध्ये भांडण-तंटे वाढत आहे. याला आळा बसावा यासाठी महिलावर्गाकडून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात असली तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यामुळे महिला हतबल झाल्या आहेत.
एकीकडे या परिसरात रोजगार उपलब्ध नाही. कोणता रोजगार मिळाल्यास दोन-तीनशे रुपये रोजी कमावलेली व्यक्ती तो पैसा दारूमध्ये उडवते. यामुळे अनेक घरात आर्थिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना कमलापूरमध्ये सर्रास दारू विक्री केली जात असल्यामुळे महिलांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
गावातील अनेक महिलांनी कमलापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच श्रीनिवास पेंदाम यांची भेट घेऊन दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. सरपंचांनी रेपनपल्ली उपपोलीस स्टेशनला निवेदन दिले. पण त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दारूबंदीचा फायदा घेत काही ठिकाणी बनावट दारूही भरपूर प्रमाणात पुरविली जात असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.