हिवतापाचे मृत्यू कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करण्यावर भर द्या

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली : हिवतापाने होणारे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी केले. जागतिक हिवताप दिनानिमित्त दि.25 ला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात हिवतापाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात जास्त आहे. जागतिक हिवताप नियंत्रण दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातून प्रभातफेरीचे आयोजन केले होते. प्रभातफेरीची सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे व राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. प्रभातफेरीद्वारे हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या हिवतापविषयक घोषवाक्यांच्या निनादात ही प्रभातफेरी मुख्य मार्गाने फिरवून महिला व बाल रुग्णालयात विसर्जित करण्यात आली.

जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रफुल गोरे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.पंकज हेमके, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.रुचिता खांडरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे, साथरोग अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम, हिवताप नोडल अधिकारी डॉ.नन्नावरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.लोकेश कोटवार तसेच फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे जिल्हा समन्वयक संघरक्षक मुंजमकर मंचावर उपस्थित होते.

उल्लेखनिय कार्यासाठी प्रशस्तीपत्राने गौरव

सन 2023-24 या वर्षात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप व हत्तीरोग आजार प्रतिबंधाबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरोग्य संस्थेतील आशा स्वयंसेविका जयश्री कोपुलवार प्रा.आ.केंद्र कसनसूर, बबिता किरंगे प्रा.आ. केंद्र गोडलवाही, शांती बोगा प्रा.आ.केंद्र कोटगुल, हायसला मोहुर्ले प्रा.आ.केंद्र कसनसूर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेश कार्लेकर यांनी तर आभार प्रकाश बारसागडे यांनी मानले.