अलिशान टाटा सफारीमधून सुरू होती पाच लाखांच्या देशी दारूची वाहतूक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला एलसीबीची कारवाई

गडचिरोली : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशनाला उधान येते. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करांकडून आधीपासूनच व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सुरू असतो. अशाच प्रयत्नात चंद्रपूर जिल्ह्यातून दारूची आयात करणारे एक वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.३१ च्या पहाटे पकडून तस्करांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. विशेष म्हणजे टाटा सफारी या अलिशान कारमधून ही दारू वाहतूक सुरू होती.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.निरीक्षक उल्हास भुसारी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मध्यरात्री गस्त करत असताना चंद्रपूरकडून गडचिरोलीजवळच्या सेमानामार्गे एक वाहन दारूच्या पेट्या घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गस्त करणाऱ्या पथकाने मुडझा ते वाकडीदरम्यान हे वाहन गाठले. पण अंधाराचा फायदा घेऊन चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने पळ काढला. त्या वाहनात काचांना काळी फिल्म लावून ५ लाख २० हजार रुपयांच्या देशी दारूच्या ६५ पेट्यांची वाहतूक सुरू होती.

याप्रकरणी स्नेहल उंदीरवाडे (रा.इंदिरानगर) आणि किरण ताडपल्लीवार (रा.शिवणी) या दोघांवर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दारू आयातीच्या व्यवसायात यापूर्वीही त्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. मात्र फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही. दारूने भरलेले हे वाहन पोटेगावकडे जाणार होते, असेही सांगितले जात आहे.