हत्तीच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुबियांची खा.नेते यांनी घेतली भेट

सांत्वना करत दिली आर्थिक मदत

आरमोरी : तालुक्यातील मौजा शंकरनगर येथील कौशल्या राधाकांत मंडल (६५ वर्ष) यांचा दि.२९ डिसेंबर रोजी शेतात हत्तींच्या कळपाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या शंकरनगर या गावी जाऊन मंडल कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना आधार देत खा.नेते यांनी आपल्याकडून आर्थिक मदतसुद्धा दिली.

यावेळी खासदारांनी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शासनस्तरावरून लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच हत्तीच्या कळपाच्या हल्ल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना वाचविण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव नंदू पेठ्ठेवार, शंकरनगरच्या सरपंच अनिता मंडल, हरीदास मंडल, पोलिस पाटील गोपाल सौरनकार, रंजन राय, दीपक सरदार, अशोक चक्रवती, बाहोतोश राय, तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.